पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती.
👉प्रस्तावना–
प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला आहे.
👉शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन कोण करतात?
शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये नियमितपणे करण्यात येत आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत घेण्यात येते.
👉शासन निर्णयातील-अटि व शर्ती काय आहेत?
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-
👉कोणत्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात?
१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाआनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
२) आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविणा-या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे:-
अ) सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.
ब) सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहीत शुल्क आकारण्यात येईल.
क) सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
ड) सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
इ) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.
👉 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता:-
१) विदयार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
२) विदयार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वीत शिकत असावा.
👉शिष्यवृत्तीची रक्कम किती?
- (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रू. ५००/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ५०००/- प्रतिवर्ष) व
- माध्यमिक शाळा (इयत्ता ८ वी ) सर्व संचाकरीता रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ७५००/- प्रतिवर्ष) इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- पाचवीसाठी मिळणार वार्षिक 5000 रुपये (तीन वर्ष )
- आठवी साठी मिळणार वार्षिक 7500 रुपये (दोन वर्ष )
👉शिष्यवृत्तीचे सुधारीत दर सन 2023-24 पासून लागू आहेत.
- विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार जिल्ह्याचे मेरिट ठरवले जाईल.
👉विद्यानिकेतन शाळेत प्रवेश कोणाला मिळतो?
- शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरताना मुलांनी विद्यानिकेतन या पर्यावर Yes करणे.
- उपलब्ध जागेच्या मेरिट नुसार यादी लागते.
- 5 वी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते.
👉 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा:-
विदयार्थ्यांचे वय १ जून रोजी खाली दर्शविलेल्या वयापेक्षा जास्त नसावे.
प्रवर्ग दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयता ५ वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयता ८ वी)
- सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षे
- दिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे
👉पात्र किंवा अपात्र घोषित-
सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थीच पात्र होतील.पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती.
👉परीक्षेच्या आवेदन पत्र केव्हा सुरू होतात?
पाचवी आठवी स्कॉलरशिप परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होते.
👉 परीक्षेची तारीख व वार-
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या/तिस-या रविवारी घेण्यात येईल.
👉परीक्षेचे ठिकाण-
शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाईल.
👉अर्ज कसा करावा?
सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत.
(Website: http://www.mscepune.in)
👉 परीक्षा शुल्क किती?
बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी-
प्रवेश शुल्क रु.50/-
परीक्षा शुल्क रु.150/-
एकूण 200/-
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती,भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी-
प्रवेश शुल्क रु.50
परीक्षा शुल्क रु.75
एकूण रु.125
- याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु.200/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल.
👉परीक्षेचे माध्यम-
मराठी/हिंदी/गुजराती/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड असे असेल. इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी च्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर असेल तोच पेपर उपलब्ध करुन दिला येईल.
👉परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या…
इ.१ ली ते इ.५वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व
इ.१ ली ते इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) घेण्यात येईल.
👉परीक्षेचे स्वरूप कसे असते?
सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतात.
प्रश्नांची काठिण्य पातळी :-
१) कठीण प्रश्न ३०%
२) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
3) सोपे प्रश्न 2০%
👉प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असते?
- प्रत्येक पेपरसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच देण्यात येतील.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल,
परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
👉शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व वेळ-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) पुढीलप्रमाणे असेल:-
पेपर-विषय-प्रश्न संख्या- गुण-वेळ
पेपर -1
प्रथम भाषा- प्रश्न संख्या-25- गुण-50
गणित- प्रश्न संख्या-50, गुण-100
एकूण प्रश्न संख्या-75,गुण-150
वेळ-1 तास 30 मिनिटे
पेपर-2
तृतीय भाषा- प्रश्न संख्या-25 गुण-50
बुध्दिमत्ता चाचणी प्रश्न संख्या- 50, गुण-100
एकूण प्रश्न संख्या- 75 गुण-150
वेळ-1 तास 30 मिनिटे
👉 शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी:-
१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी) / माध्यमिक (इयत्ता ९ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रदद करण्यात येईल.
२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल.यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही.
३) विद्यार्थ्यां ने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्यां ने/पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
👉शिष्यवृत्तीचे वितरण कसे केले जाते?
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व |FSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. सदर माहितीसह विद्यार्थ्यां च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांना पाठवावा. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांचेवर राहील.