SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय!

राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

 

दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण ‘OMR’ गुणपत्रिकांऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे, बनावट गुणास आळा बसणार आहे.

 

राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा १० ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत.

 

प्रात्यक्षिक व तोंडी श्रेणीअंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

 

राज्य मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रवारी, तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. कोरोना साथीच्या काळानंतरही विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव अद्यापही कमी असल्याने राज्य मंडळाने यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालयावर कारवाई-

दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहेत. विज्ञानाचे प्रयोग न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगवर विद्यार्थीसंख्या दाखविली जाते, अशा तक्रारी आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास राज्य मंडळाकडून महाविद्यालयास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *