अंगणवाडी सेविकांना मिळणार शासनाकडून दिवाळीसाठी 2000 रुपयांची भाऊबीज..
बालकांच्या आरोग्य व पोषणाची व शिक्षणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला “भाऊबीज” देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदोतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका घेत असतात. ते सरकार आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात.
सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात घेऊन शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ वितरित करण्यात येणार आहे.
“भाऊबीज भेट” साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय (दि. 18/10/2023) महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजनेसह मानधनवाढ करण्याची बाब विचाराधीन आहे. याबाबत निश्चितच येत्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वर्तविण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका पगार किती आहे?
मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख सात हजार नऊशे एकसष्ठ कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन 4050 वरून 5,000 रुपये, मदतनीसांचे मानधन 2000 वरून 2,500 रुपये होईल, तर मिनी अंगणवाडी सेविकेला 1950 ऐवजी 2400 रुपये मानधन मिळेल.