मोठा निर्णय! जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांसाठी आता एक इंग्रजी शिक्षक; राज्यात ४८६० केंद्र शाळा; केंद्रातील शाळांमध्ये त्या शिक्षकांची ड्यूटी

 

Teacher Recruitment 2024:राज्यात जिल्हा परिषदांच्या ६५ हजारांवर शाळा असून सद्य:स्थितीत त्याठिकाणी इंग्रजी विषयांचे शिक्षक अत्यल्प आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढल्याने आता शालेय शिक्षण विभागानेही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये स्वतंत्र इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक केंद्र शाळेसाठी इंग्रजीचा एक शिक्षक असणार आहे. केंद्राअंतर्गत असलेल्या सर्वच शाळांमध्ये त्या शिक्षकाची ड्यूटी असेल. आठवड्यातील दिवस त्या शिक्षकाला ठरवून अध्यापन करावे लागणार आहे.

 

राज्यात जिल्हा परिषदेच्या चार हजार ८६० केंद्र शाळा आहेत. सेमी इंग्रजीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या, जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या त्यामुळे कमी झाली. दहा हजारांहून अधिक शाळांचा पट २० पेक्षाही कमी असल्याची वस्तुस्थिती आहे.

 

या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सध्याच्या शिक्षक भरतीतून रिक्त पदांच्या २२ ते २५ टक्के शिक्षक इंग्रजी विषयांचे असणार आहेत. त्याला मराठीतून डीएड किंवा शिक्षण झालेल्या उमेदवारांनी विरोध दर्शविला आहे, पण पालक व विद्यार्थ्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता प्रत्येक जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील केंद्र शाळा व सेमी इंग्रजीच्या वर्गांवर इंग्रजीचे किती शिक्षक आहेत आणि किती अपेक्षित आहेत याची मागणी पवित्र पोर्टलवर करायची आहे. त्यानुसार त्यांना शिक्षक दिले जाणार आहेत.

 

संपूर्ण‌ शिक्षण इंग्रजीतून झालेल्यांना प्राधान्य-

 

जिल्हा परिषदांच्या प्रत्येक केंद्र शाळेसाठी एक इंग्रजी शिक्षक दिला जाणार आहे. इंग्रजी विषयाचे संपूर्ण अध्यापन त्याने त्यातूनच करणे अपेक्षित आहे. एका केंद्राअंतर्गत १०-१२ शाळा असतील तर त्या शिक्षकाला आठवड्यातील दिवस निश्चित करून त्या प्रत्येक शाळेत जावून इंग्रजी विषय शिकवावा लागणार आहे. इंग्रजी विषयासाठी नेमणूक करताना संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून व डीएड देखील त्यातूनच झालेल्या उमेदवाराला पहिले प्राधान्य असेल. त्यानंतर पदवी- पदव्युत्तर शिक्षण इंग्रजीतून पण डीएट मराठीतून झालेला आणि शेवटी संपूर्ण शिक्षण मराठीतून पण डीएड इंग्रजीतून झालेल्यांना संधी मिळणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

 

झेडपी शाळांमधील शिक्षक भरती

एकूण शाळा-

६५,४२०

झेडपीच्या केंद्र शाळा-

४,८६०

‘इंग्रजी’ विषयाचे शिक्षक-

५,०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *